मुंबई : धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याऐवजी त्यांच्या खात्यात डीबीटी योजनेच्या माध्यमातून थेट पैसे देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिले. विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याबाबतचा मुद्दा अनेक आमदारांनी उपस्थित केला, यावर उत्तर देताना त्यांनी हे आश्वासन दिले.
अनेकदा मूळ धान उत्पादक शेतकऱ्यांना पैसे जाण्याऐवजी ते व्यापारी वर्गाकडे जातात. आसपासच्या राज्यातही धानाला बोनस दिला जातो. मात्र त्या राज्यातील धान आपल्या राज्यात येते आणि ते पण बोनसचा फायदा घेतात, याकडेही अजित पवार यांनी यावेळी लक्ष वेधले. बाहेरच्या राज्यातील धान येऊन आपल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान होऊ नये, त्यांचा फायदा व्हावा यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांची बैठक घेतली होती, असेही अजित पवार यांनी सभागृहात सांगितले.
धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याऐवजी त्यांच्या खात्यात डीबीटी योजनेच्या माध्यमातून थेट पैसे देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांनी विधानसभेत दिले. विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याबाबतचा मुद्दा अनेक आमदारांनी उपस्थित केला. यावर त्यांनी उत्तर दिले. pic.twitter.com/MyGWgDSIxL
— NCP (@NCPspeaks) December 28, 2021
या सगळ्याचा विचार करून महाविकास आघाडी सरकारने डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट खात्यात पैसे मिळवून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जे खरे धान उत्पादक आहेत त्यांना पैसे मिळतील. त्यांच्या नावाखाली सुरू असलेली दुकानदारी फार मोठी आहे, याचा विचार मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली झाला असल्याचे अजित पवार यांनी सभागृहात स्पष्ट केले.




