जागतिक उपासमारी निर्देशांकाच्या यादीत भारत 94 क्रमांकावर आला आहे. यावरुन कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. बालकांचा उपासमारीने मृत्यू होत आहे. देशातील धान्यांची गोदामं भरलेली असताना केंद्र सरकार असे का घडू देत आहे? असा सवाल त्यांनी केला आहे.
राहुल गांधींनी ट्वीट करत म्हटलं आहे की, “मोदींनी बनवलेल्या आपत्तींमुळे भारत देशाला सातत्याने अडचणींचा सामना करावा लागतोय, खासकरुन बालकांचा उपासमारीने मृत्यू होत आहे. हे अत्यंत हृदयद्रावक आहे. जर देशातील धान्यांच्या गोदामात अतिरिक्त धान्यांचा साठा असेल तर मग केंद्र सरकार असे का घडू देत आहे?”
India continues to suffer from Modi-made disasters. The stories of starvation deaths, especially of children, are heartbreaking.
How can GOI allow this when the godowns are overflowing with excess food?
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 21, 2020
काही दिवसांपूर्वी जागतिक उपासमारी निर्देशांक म्हणजे ग्लोबल हंगर इंडेक्स 2020 हा अहवाल जाहीर झाला होता. त्यात 107 देशांच्या यादीत भारताचा 94 वा क्रमांक होता. या यादीत भारताचे शेजारी नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका हे शेजारी देश भारतापेक्षा सरस ठरले आहेत. भारताच्या खाली फक्त 13 देश असून त्यात आफ्रिकन अविकसित देशांचा समावेश होतो. उपासमारीच्या प्रश्नावर भारताची स्थिती ‘गंभीर’ असल्याचं सांगण्यात आलं आहे. विशेषत: लहान मुलांच्या कुपोषणाचे प्रमाण खूप भयानक आहे असं त्यात म्हटलं आहे.




