बंगाल : पश्चिम बंगालमध्ये विवाहबाह्य संबंधावरून एका जोडप्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसच्याच एका कार्यकर्त्याने सार्वजनिकरित्या ही मारहाण केल्याचा दावा केला जातोय. आजूबाजूला जवळपास २०० लोकांचा जमाव होता. या जमावासमोर एका पुरुषाला आणि महिलेला लाथा-बुक्क्यांनी आणि काठ्यांनी मारण्यात आलं. यावरून भाजपाने आणि सीपीआय या पक्षांनी तृणमूलवर निशाणा साधला आहे. तर हा प्रकार समर्थनीय नसल्याची प्रतिक्रिया तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी दिली आहे.
२८ जून रोजी पश्चिम बंगालच्या चोप्रा ब्लॉक येथे साळिशी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत या दोघांच्या विवाह्यबाह्य संबंधाविषयी चर्चा सुरू होती. याचवेळी या दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. ताजिमूल इस्लाम असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. हा तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्ता असून त्याला परिसरात जेसीबी म्हणूनही ओळखलं जातं. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच ताजिमूल इस्लामला पोलिसांनी अटक केली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतंय त्यानुसार, आजूबाजूला घोळका जमला आहे. घोळक्याच्या मधे या जोडप्याला एक काळा टीशर्ट घातलेली व्यक्ती बेदम मारहाण करत आहे.