भारतीय संस्कृतीनुसार महिलेच्या कमरेखाली स्पर्श करणे हा तिच्या शालीनतेला धक्का आहे, असे मुंबईतील विशेष पोक्सो न्यायालयाने नमूद केले. दहा वर्षांच्या मुलीच्या पार्श्वभागाला स्पर्श केल्याप्रकरणी करण्यात आलेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने २२ वर्षांच्या तरुणाला पाच वर्षांची शिक्षा सुनावली. २०१७ मध्ये आरोपीवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, १० वर्षांची मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत मंदिरात जात होती. त्यावेळी तिच्या घराजवळ असलेल्या दुकानाच्या जवळच बसलेल्या मुलांपैकी एका मुलाने तिच्या पार्श्वभागाला स्पर्श केला. या प्रकाराने ती मुलगी खूप घाबरली आणि घरी गेली. तिने घडलेला प्रकार तिच्या आई – वडिलांना सांगितला. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी आरोपीविरोधात पोलीस स्थानकात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेची दखल घेत दुसऱ्या दिवशी आरोपीला अटक केली. त्यानंतर न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला होता.
दरम्यान, आरोपीच्या वकिलाने युक्तिवाद करत छेड काढणे आणि स्पर्श करणे यात फरक आहे. तसेच पार्श्वभाग हा खाजगी भाग म्हणता येणार नाही, असा बचाव केला. आरोपीच्या वकिलाने गूगलवरील अर्थाचा संदर्भ देत पार्श्वभाग हा खाजगी किंवा संवेदनशील असू शकत नाही, असा तर्क देखील मांडला.
न्यायालयाने यावर म्हटलं कि, संवेदनशील भाग किंवा खासगी भाग हा शब्दप्रयोग आपल्या समाजातील अर्थानुसार ग्राह्य़ धरायला हवा. त्यानुसार विचार केला तर आपल्याकडे हा अर्थ स्वीकारला जाणार नाही. आरोपीने लैंगिक अत्याचाराच्या हेतूने मुलीच्या पार्श्वभागाला स्पर्श केला नाही असे म्हणता येणार नाही. आरोपीने आपल्या गुप्त भागाला स्पर्श केल्याचे मुलीने आई-वडिलांना आणि पोलिसांना सांगितले होते. घटना घडली तेव्हा मुलगी अवघी १० वर्षांची होती. त्यामुळे तिला त्यावेळी जे कळले त्यानुसार तिने आई-वडिलांना सांगितले. त्यावरून आरोपीने तिची केवळ छेडछाड काढली नाही, तर तिला अयोग्यरीत्या स्पर्श केला, असे निकालात नमूद करत न्यायालयाने आरोपीला पाच वर्षांची शिक्षा सुनावली.




