पुणे : स्वारगेट बस स्थानकामध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये एका तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. २५ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक केली आहे. मात्र, घटनेला एक महिना उलटून गेला तरीही गाडे याच्याविरुद्ध कोणतेही आरोपपत्र अद्याप दाखल झालेले नाही. तसेच गाडेची डीएनए चाचणी करण्यात आली, या चाचणीचा अहवाल अद्याप पोलिसांना उपलब्ध झालेला नाही.
गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले कि, गाडे याची डीएनए चाचणी करण्यात आली. फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडून अद्याप डीएनए चाचणी अहवाल मिळालेला नाही. डीएनए चाचणी अहवाल मिळाल्यानंतर गाडे यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले जाईल. पोलिसांनी गाडेचे कपडे जप्त केले आहेत. गाडे याच्याविरुद्ध तांत्रिक आणि फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्यात आले आहेत. या प्रकरणात, पीडित मुलीचा जबाब न्यायाधीशांसमोर नोंदवण्यात आला आहे. तसेच, ज्या बसमध्ये गाडे याने तरुणीवर लैंगिक अत्याचार केला त्या बसच्या चालक आणि कंडक्टरचे जबाबही पोलिसांनी नोंदवले आहेत. गाडेने त्याचा मोबाईल फेकून दिला होता. पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोबाईल सापडला नाही.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंगळवारी (२५ मार्च) माध्यमांशी बोलताना सांगितले कि, स्वारगेट बसस्थानकाच्या परिसरात तरुणीशी झालेल्या कृत्याचा तपास अंतिम टप्प्यात आहे. या प्रकरणात लवकरच आरोपपत्र दाखल केले जाईल. येत्या काही दिवसांत त्याबाबत माहिती दिली जाईल.
आरोपी गाडे न्यायालयीन कोठडीत
आरोपी दत्तात्रय गाडे हा मूळचा शिरूर तालुक्यातील गुणाट गावचा आहे. महिलेवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तो पळून गेला. तो गुणाट गावातील उसाच्या शेतात लपून बसला होता. तीन दिवसांनंतर पोलिसांनी सापळा रचून आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने गाडेला अटक केली. गाडेविरुद्ध ठोस पुरावे गोळा करण्याचे काम पोलिस करत आहेत. तो आता न्यायालयीन कोठडीत आहे.




