उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथे दलित मुलींच्या मृत्यूचा पोलिसांनी खुलासा केला आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांनी सांगितले की, ही घटना एकतर्फी प्रेमातून घडली आहे. आरोपीची या तिघींपैकी एका दलित मुलीशी ओळख होती. त्याने तिच्यासमोर आपले प्रेम व्यक्त केले होते. परंतु, तिने नकार दिल्यानंतर या मुलाने पाण्याच्या बाटलीत कीटकनाशक मिसळले आणि ते पाणी मुलीला प्यायला दिले. मात्र अजाणतेपणी दुसऱ्या दोन्ही मुलींनी देखील तेच पाणी प्यायले.
१7 फेब्रुवारीला काजल, कोमल आणि रोशनी या तीन मुली बबुरहा गावात शेतामध्ये संशयास्पद परिस्थितीत आढळल्या होत्या. त्यांच्या तोंडातून फेस बाहेर येत होता. काजल आणि कोमल यांचा मृत्यू झाला तर रोशनीवर कानपूर येथे उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती चिंताजनक आहे.
फॉरेन्सिक टीमला तपासादरम्यान घटनास्थळावरून बाटल्या आणि चिप्सची पाकिटं मिळाली होती. या पुराव्यांवरून पोलिस आरोपीपर्यंत पोहोचले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी दोन तरुण शेतातून पळताना दिसले. यानंतर त्यांचा शोध घेण्यात आला आणि त्यानंतर या तरुणांना अटक करण्यात आली. विनय हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. तर दुसरा आरोपी अल्पवयीन आहे. विनय एका मुलीवर प्रेम करत होता. त्याने मुलीकडे मोबाईल नंबर मागितला, पण मुलीने त्याला नकार दिला. त्यानंतर विनयने तिला जिवे मारण्याचा कट रचला.
मुलीच्या कुटूंबाने या प्रकरणात 18 तासांनंतर पोलिसांत तक्रार दिली. या प्रकरणाचा बलात्कार आणि ऑनर किलिंगच्या बाजूने देखील तपास करण्यात आला. तथापि, यात कोणत्याही प्रकारच्या जखमा किंवा लैंगिक छळ झाल्याच्या खुणा नव्हत्या. पोस्टमार्टम अहवालात विषबाधा झाल्याची खात्री झाली होती.