देशात कोरोना संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढत आहे. त्यातच कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने देखील चिंतेत भर पडली आहे. या नव्या स्ट्रेनमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान कार्यालयात तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.
कोरोना व्हायरसमध्ये म्युटेशन होत असते, त्यातून नव्या स्ट्रेनची निर्मिती होते. काही राज्यांमध्ये कोरोना रुग्ण संख्या वाढली असून काही ठिकाणी नवीन स्ट्रेन देखील आढळून आले आहेत. महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढीमागे नवा स्ट्रेन असू शकतो, असे महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले होते. महाराष्ट्र तसेच केरळ, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि पंजाबमध्येही दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे.
झपाट्याने होत असलेली रुग्णवाढ कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे झाली आहे का, याबाबत संशोधन सुरु आहे. देशातील एकूण रुग्णसंख्येच्या 38 टक्के सक्रिय कोरोना केसेस एकट्या केरळमध्ये आहेत तर महाराष्ट्रात 37 टक्के सक्रिय केसेस आहेत. त्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असून यावर तातडीने उपाययोजना करणे अतिशय गरजेचे आहे.