पुणे : लोणीकंद येथील गोल्डमॅन सचिन शिंदे खून प्रकरणी ४८ तासात तीन जणांना लोणीकंद पोलिसांचे गुन्हे शोध पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. लोणीकंद पोलीसांनी या प्रकरणी सचिन किसन शिंदे (वय ३२), प्रथमेश उर्फ सनी कुमार शिंदे (वय 20), रोशनकुमार शमशेर साहू उर्फ गौंड (वय 20) यांना आज अटक केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद येथे मंगळवारी (ता.९) रोजी दुपारी ११.५० च्या सुमारास एचडीएफसीच्या एटीएम समोर सचिन नानासाहेब शिंदे सहकाऱ्यांबरोबर गप्पा मारत होता. अचानक एका अज्ञात व्यक्तीने पिस्तुलाने सचिन नानासाहेब शिंदे याच्या पाठीमागून येऊन त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस गोळीबार केला. भगव्या रंगाच्या स्कूटर चालविणाऱ्या साथीदाराच्या पाठीमागे बसून नगर रोडने पेरणे गावाच्या दिशेने पलायन केले. यात सचिन शिंदे याचा उपचारापूर्वीच मृत्यु झाला.
गोल्डमॅन अशी ओळख असलेला सराईत गुन्हेगाराचा गोळ्या झाडून खून…
पोलीस खात्याने या घटनेची गांभीर्याने दखल घेत लोणीकंद गुन्हे शोध पथक व स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या पथकांनी संयुक्त तपास करीत या खून प्रकरणात सचिन किसन शिंदे (वय ३२), प्रथमेश उर्फ सनी कुमार शिंदे (वय 20), रोशनकुमार शमशेर साहू उर्फ गौंड (वय 20) या तिघांना अटक केली आहे.. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले आहे. हा गुन्हा त्यांनी आणखी साथीदारांचे मदतीने केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत..




