मुंबई : शिवजयंती उत्सव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. परंतु, यावर्षी कोरोना संसर्गामुळे १९ फेब्रुवारी २०२१ रोजीचा ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना देखील जाहीर करण्यात आल्या आहेत.
शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठीच्या गाईडलाईन्स :
- अनेक शिवप्रेमी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन तारखेनुसार दि. १८ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री १२ वाजता देखील एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात. परंतु यावर्षी कोविड-१९ चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.
- यावर्षी सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.
- तसेच कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन फक्त १० व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
- शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी.
- आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
- कोविड-१९ च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.
- या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.




