जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्याच्या मुद्द्यावरून काळ विधानसभेत बराच वादविवाद झाला. त्यानंतर आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणी निवेदन सादर करत सहा महिला अधिकाऱ्यांनी सादर केलेला अहवाल पटलावर मांडला. अनिल देशमुख यांनी यावेळी पोलिसांवर लावण्यात आलेल्या आरोपात तथ्य नसल्याचं सांगत असं काही घडलंच नसल्याची माहिती दिली.
अनिल देशमुख यांनी सांगितलं कि, “या प्रकरणाच्या चौकशीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची जी समिती स्थापन करण्यात आली होती, त्यामध्ये चार महिला अधिकाऱ्यांचा समावेश होता. या वसतीगृहात 17 महिला राहत होत्या. 20 फेब्रुवारी रोजी या वसतीगृहात काही सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले होते त्यात गरबा, कविता वाचन, गाण्याचा कार्यक्रम होता. तेव्हा एका महिलेने त्रास झाल्यामुळे अंगातील झगा उतरवून ठेवला होता. यावेळी त्याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. महिला अधिकाऱ्यांनी तिथे भेट देऊन सर्व कामकाज पाहिलं, महिलांशी चर्चा केली आणि या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली. त्यामध्ये पोलीस वसतीगृहात आल्याची कुठलीही नोंद नाही. महिलांचं वसतिगृह असल्याने एकही पोलीस कर्मचारी आत जाऊ शकत नाही. तसेच पोलिसांनी महिलांना कपडे काढून नाचायला लावल्याचा प्रकार कुठेही आढळून आला नाही. याबाबतचा अहवाल महिला अधिकाऱ्यांनी दिला असून तो मी पटलावर ठेवतो.”




