State Government is committed to the welfare of common students – Chief Minister Eknath Shinde

राज्य शासन सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र शैक्षणिक

लातूर : राज्य शासन गोरगरीब सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असून विद्यार्थ्यांनी शासनाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सामाजिक न्याय विभागाकडून लातूर जिल्ह्यात बांधण्यात आलेल्या जळकोट आणि अहमदपूर येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या, तसेच लामजना येथील शासकीय निवासी शाळेच्या इमारतींच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या लोकार्पणप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्यासह लातूरचे खा. सुधाकर शृंगारे, खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, आ. रमेश कराड, आ. अमित विलासराव देशमुख, आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. बाबासाहेब पाटील, आ. धीरज विलासराव देशमुख, आ. अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होत्या.

लातूर जिल्ह्यातील मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या दोन इमारती आणि शासकीय निवासी शाळेची एक इमारत या कामांसाठी इमारतीसाठी एकूण 29 कोटी 86 लक्ष रुपये निधी आणि 2 हेक्टर 20 आर जमीन उपलब्ध करून देण्यात आली. या दोन वसतीगृहांमुळे 200 विद्यार्थीनींची निवास व भोजनाची व्यवस्था झालेली आहे. तसेच निवासी शाळेमुळे 200 मुलांची शिक्षणाची व निवासाची व्यवस्था झालेली आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांना भोजन, निवास, गणवेश, क्रीडा साहित्य, ग्रंथालय आणि संगणक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांनी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

सामाजिक न्याय विभाग राबवित असलेल्या विविध योजनांची मुख्यमंत्री शिंदे यांनी माहिती दिली. शासकीय तसेच अनुदानित वसतिगृहांच्या माध्यमातून एकूण दीड लाख विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती व सामाजिक न्याय विभागासाठी करण्यात येत असलेली तरतुदीची माहिती दिली. तसेच मागासवर्गीय घटकांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत विभागाचे सचिव सुमंत भांगे व विभागाच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

लोकार्पण झालेल्या इमारती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या जळकोट येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहाच्या इमारतीसाठी 60 आर जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच बांधकामासाठी 10 कोटी 81 लक्ष रुपये निधी देण्यात आला होता. 100 विद्यार्थी संख्येच्या या वसतिगृहाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त मान्यता देण्यात आली होती. तसेच अहमदपूर येथील मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या बांधकामासाठी शासनाने 8 कोटी 50 लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला होता. या वसतिगृहाची विद्यार्थी क्षमताही शंभर विद्यार्थ्यांची आहे. औसा तालुक्यातील लामजना येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या निवासी शाळेसाठी 100 आर जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच या शाळेच्या इमारतीच्या बांधकामासाठी 10 कोटी 55 लक्ष रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. 200 विद्यार्थी क्षमता असलेल्या या निवासी शाळेच्या इमारतीचेही आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण झाले.

शैक्षणिक केंद्र असलेल्या लातूर जिल्ह्यात सर्वाधिक निवासी वसतिगृहे
लातूर जिल्हा हे शैक्षणिक केंद्र असल्याने जिल्ह्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्यातील सर्वाधिक 25 वसतिगृहे कार्यरत आहेत. यामध्ये मुलांची 13 आणि मुलींच्या 12 वसतिगृहांचा समावेश आहे. यामध्ये 2 हजार 790 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. तसेच जिल्ह्यात सहा निवासी शाळा कार्यरत असून यामध्ये 1 हजार 200 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत