Senior social activist Anil Avchat passes away
महाराष्ट्र

दुःखद! ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचं निधन

पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचं निधन झालं आहे. आज (२७ जानेवारी) सकाळी सुमारे ९.१५ वाजताच्या सुमारास सुप्रसिद्ध लेखक, समाजसेवक डॉ. अनिल अवचट ह्यांचे दीर्घ आजाराने पुण्यातील पत्रकारनगर येथील त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अनिल अवचट यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व विविध प्रकारच्या कामांतून दिसून येते. मराठी साहित्यामध्ये त्यांनी त्यांच्या पुस्तकं, लेख यांद्वारे मोलाचे योगदान दिले. डॉ. अनिल अवचटांच्या लिखाणाप्रमाणेच त्यांचे सामाजिक कार्यही बहुआयामी आहे. त्यांनी त्यांच्या दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली. त्यांनी आपल्या पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची शोधलेली अनोखी पद्धती ही जगभरांतील अनेक व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते.

डॉ. अनिल अवचट हे स्वतः पत्रकार असले तरी त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला नेहमीच नकार दिला आहे. त्यांनी आपली पत्रकारिता नेहमीच गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली आहे. डॉ. अनिल अवचट यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी विपुल लिखाण केले आहे.

मुक्तांगणचे अध्यक्ष डॉ. आनंद नाडकर्णी यांनी ही दुःखद बातमी सांगताना म्हटले की डॉ. अनिता आणि अनिल अवचट यांच्या व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातील कार्याचा वसा यापुढेसुद्धा असाच पुढे चालू राहील. आज दुपारी दोन वाजेपर्यंत, पत्रकारनगर येथे त्यांचे पार्थिव, अंतिम दर्शनाकरता ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केले जातील. अनिल अवचट  यांच्या पश्चात त्यांच्या विवाहित मुली मुक्ता आणि यशोदा, अन्य कुटुंबीय, आणि मोठा मित्रपरिवार आहे.

अनिल अवचट यांना मिळालेले पुरस्कार :

  • व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्यासाठी भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार (२०१३)
  • अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार (१३-१-२०१८)
  • महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार
  • २०१७ सालचा फर्ग्युसन गौरव पुरस्कार
  • “सृष्टीत.. गोष्टीत” या पुस्तकाला साहित्य अकादमीतर्फे उत्कृष्ट बालसाहित्याचा पुरस्कार
  • डॉ. अनिल अवचट यांची पुस्तके सलग तीन वर्षे महाराष्ट्र शासनाने “सर्वोत्कृष्ट पुस्तके” म्हणून जाहीर केली आहेत.
  • अमेरिकेतील आयोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लेखकांच्या संमेलनात त्यांच्या साहित्याचा गौरव करण्यात आला आहे.
  • सातारा येथील न्या. रामशास्त्री प्रभुणे प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा सामाजिक न्याय पुरस्कार (२००७).
  • साहित्य अकादमी तर्फे प्रथम बाल-साहित्य पुरस्कार १४ नोव्हेंबर २०१०.
  • महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार २०११.
  • डॉ. अनिल अवचट यांच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राला १२व्या पुलोत्सव सोहळ्यात पुल कृतज्ञता सन्मान (२०१५) प्रदान करण्यात आला.
  • अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशन या संस्थेकडून साहित्य जीवन गौरव पुरस्कार
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत