पुणे : पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या अभिलाषा भाऊसाहेब कोथिंबिरे (वय २५) या तरुणीने हिंजवडीतील क्राउन ग्रीन हाउसिंग सोसायटीच्या २१ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे.
अभिलाषा मूळची रांजणगाव येथील असून सध्या हिंजवडी परिसरात वास्तव्यास होती. ती सेनापती बापट रस्त्यावर (एसबी रोड) स्थित एका प्रतिष्ठित आयटी कंपनीत कार्यरत होती.
३१ मे रोजी अभिलाषा दुचाकीवरून मैत्रिणीच्या इमारतीत आली होती. मात्र, ती तिच्या मैत्रिणीकडे न जाता थेट २१ व्या मजल्यावर गेली. तिथून उडी मारून तिने आपले आयुष्य संपवले.
घटनेनंतर काही वेळातच सोसायटीतील रहिवाशांनी आवारात मृतदेह पाहून पोलिसांना याबाबत माहिती दिली. हिंजवडी पोलिस ठाण्याचे पथक तपासासाठी घटनास्थळी पोहोचले, त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि ती पहाटे ४.३८ वाजता दुचाकीवरून सोसायटीत आल्याचे पुष्टी केली. काही तासांनंतर ती मृतावस्थेत आढळली. पोलिसांनी तिच्या वाहनावरून तिची ओळख पटवली. तपासादरम्यान तिच्याकडे एक सुसाईड नोट देखील सापडली आहे. त्यामध्ये तिने लिहिले होते, “मी माझं आयुष्य संपवते आहे. आता जगायची इच्छा नाही. कृपया मला माफ करा.” मात्र, आत्महत्येचे नेमके कारण तिने स्पष्ट केलेले नाही.
हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी नैराश्यग्रस्त होती, परंतु कुटुंबीयांना याबाबत कोणतीही कल्पना नव्हती. तिचे वडील म्हणाले की, ती नेहमीप्रमाणे आनंदी आणि सामान्य वागत होती.
या घटनेबाबत बोलताना हिंजवडी पोलिस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात म्हणाले, “३१ मे रोजी आम्हाला मृतदेह मिळाला. घटनास्थळी सुसाईड नोट सापडल्यामुळे प्राथमिक तपासात ही आत्महत्येची घटना असल्याचे स्पष्ट झाले आहे. आम्ही अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.” अभिलाषाच्या शव विच्छेदन अहवालात तिच्या शरीरावरील महत्वाच्या अवयवांना गंभीर इजा झाल्याचे म्हटले आहे.




