पुणे : पुण्यात वाहनाबरोबर दुचाकीस्वारालासुद्धा टोईंग व्हॅनमध्ये भरल्याची संतापजनक घटना घडली आहे. या दुचाकीस्वाराची दुचाकी नो-पार्किंग झोनमध्ये असल्याचा दावा करत पुण्यातील नानापेठ परिसरात वाहतुक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. वाहतूक पोलिसांनी काल दुपारी नाना पेठ परिसरात एका दुचाकीस्वाराला गाडीसकट टोईंग व्हॅनमध्ये भरलं. आता या घटनेवर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी समर्थ वाहतूक पोलीस विभागाअंतर्गत असलेल्या नाना पेठ परिसरात वाहतूक पोलिसांनी गाडी सकट दुचाकीस्वाराला उचलून टोईंग व्हॅनमध्ये भरले. यावेळी वाहतूक पोलिसानं दुचाकीस्वाराची गाडी नो-पार्कींगमध्ये असल्याचा दावा केला. या प्रकरणावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून ही पोलिसांची अरेरावी असल्याची चर्चा सध्या सुरु झाली आहे. दुचाकी काही ना काही कारणं सांगून अडवणं, दंड वसूल करणं अशी कामं वाहतुक पोलीस करतात, असं नागरिकांचं म्हणणं आहे. तसेच, वाहतूक पोलिसांची कारवाई करण्याची ही पद्धत चुकीची असल्याचं बोललं जात आहे.




