पुणे: पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांची आठ तास ईडीने चौकशी केली आहे. ईडीने अचानक केलेल्या या चौकशीमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
यापूर्वीही आयकर विभागाने भोसले यांच्या घरावर छापा मारला होता. भोसले यांच्या पुणे आणि मुंबईतील 23 ठिकाणांवर आयकर विभागाने धाडी मारल्या होत्या. आज सकाळी अविनाश भोसले यांना मुंबईत बोलावून घेतले. आज सकाळी 10 वाजता ते ईडीच्या कार्यालयात आले. गेल्या आठ तासांपासून त्यांची चौकशी सुरू असून ते अजूनही ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडलेले नाहीत. या चौकशी दरम्यान ईडीने त्यांच्याकडील काही कागदपत्रांची छाननी सुरू केल्याचं समजतं.
अचानक झालेल्या या चौकशीमुळे एकच खळबळ उडाली आहे. काल ईडीने पुण्यात काही ठिकाणी छापे मारले होते. त्यामुळे या संदर्भातच ईडीने भोसले यांना चौकशीसाठी बोलावले आहे का? याबाबतचं वृत्त समजू शकलं नाही. ईडीनेही त्यावर खुलासा केला नाही. तसेच भोसले यांची कोणत्या कारणासाठी चौकशी सुरू आहे? याची माहितीही ईडीकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे सस्पेन्स अधिकच वाढला आहे.