ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकावर रेल्वेची धडक बसल्याने 22 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. धुळे जिल्ह्यातील वडजाई गावचा रामेश्वर भरत देवरे (वय 22) हा तरूण सैन्य भरतीसाठी मुंबईत आला होता. या भरतीसाठी वडजाई आणि परिसरातून सुमारे 25 तरुण गेलेले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामेश्वर देवरे मुंब्रा येथील लष्कर भरतीसाठी गेला होता. दरम्यान, मुंब्रा रेल्वे स्थानकावर रात्री 11 वाजता ही घटना फलाट क्रमांक-3 वर घडली. मुंब्रा रेल्वे स्थानकावर उभा असताना त्याला अचानक मळमळल्यासारखे जाणवले आणि उलटी आल्यासारखे वाटले. त्यामुळे तो धावत रेल्वे रुळाच्या दिशेने गेला आणि खाली बसला. उलटी होत असल्याने त्याने कानावर हात ठेवले होते. मात्र, याचवेळी सुसाट आलेल्या रेल्वेची त्याला जोरदार धडक बसली. त्यानंतर रामेश्वर सुमारे दहा ते बारा फुटापर्यंत लांब फेकला गेला. जोरदार धडकेत त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
मुंब्रा स्थानक @mumbairailusers pic.twitter.com/7qGpQT88zm
— Harshad Chambawane (@Harshchambawane) September 22, 2022
या घटनेनंतर रेल्वे पोलिस तेथे दाखल झाले. प्राथमिक तपासानंतर शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मध्यरात्री रुग्णवाहिका रामेश्वर याच्या गावी दाखल झाली. रामेश्वरच्या अशा अचानक मृत्यूने त्याच्या कुटुंबियांना आणि गावकऱ्यांना मोठा धक्का बसला असून गावात शोककळा पसरली आहे. रामेश्वर यांच्या पश्चात आई-वडील, मोठी बहिण व लहान भाऊ असा परिवार आहे.




