crime

पुणे : पाच वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा, बहिण-भावानेच केली लहान भावाची हत्या

क्राईम पुणे महाराष्ट्र

पुणे : पुण्यात पाच वर्षांपूर्वी घडलेल्या हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. मृत व्यक्तीच्या बहिण-भावानेच त्याची हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं. एक खोली नावावर करण्याच्या वादातून बहिण-भावाने त्यांच्या मित्रांच्या मदतीने २३ वर्षांच्या सख्ख्या लहान भावाला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला कॅनॉलमध्ये ढकलून त्याचा खून केल्याचे गुन्हे शाखेच्या युनिट तीनने उघडकीस आणले आहे. पोलीसांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या तपासानंतर आणि प्रचंड मेहनतीनंतर या प्रकरणाचा उलगडा झाला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, पंकज चंद्रकांत दिघे (वय २३, एरंडवणा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याला  कॅनोलमध्ये ढकलून देणारा मित्र महेश बाबुराव धनावडे (वय ३७, शिवणे) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात पंकजचा भाऊ सुहास चंद्रकांत दिघे (वय २९), बहिण अश्विनी आडसुळ यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अंमलदार राजेंद्र मारणे यांनी तक्रार दाखल केली आहे.

पंकज, सुहास आणि अश्विनी हे सख्खे भाऊ बहिण आहेत. त्यांच्या आईचे आजाराने निधन झालेले आहे. दिघे कुटूंब एरंडवणा परिसरात राहत होते. पंकज काही काम करत नव्हता. तो राहत्या घरातील एक खोली माझ्या नावावर करा, असे म्हणून वाद घालत होता. त्यामुळे सुहास व अश्विनी यांनी त्याला ठार मारण्याचा कट रचला. त्यानुसार, १४ मार्च २०१७ रोजी सायंकाळी त्याला मित्र महेश व प्रशांत यांच्या मदतीने चौघांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला महेशच्या तवेरा गाडीतून डेक्कनमधील कॅनॉल येथे नेऊन कॅनॉलच्या पाण्यात ढकलून दिले.

दरम्यान, पोलिसांची दिशाभूल करण्याच्या हेतूने पाच दिवस याबाबत काहीएक न बोलता ते शांत राहिले. त्यानंतर १९ मार्च २०१७ रोजी पंकजचा भाऊ सुहासने पंकज बेपत्ता असल्याची तक्रार डेक्कन पोलीसांकडे दिली. दरम्यान, १८ मार्च रोजी पंकजचा मृतदेह कॅनोलमध्ये वाहून हडपसरमध्ये मिळून आला. त्याबाबत हडपसर पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. दरम्यान, गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलीस अंमलदार राजेंद्र मारणे यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी पोलीस निरीक्षक अनिता मोरे यांना याबाबत माहिती देत तपासाला सुरूवात केली.

प्रथम त्यांनी पंकजचा मिसींग रिपोर्ट कुठे दाखल आहे, याचा शोध घेतला. त्यानंतर कुठे मृतदेह आढळून आला आहे का, याची माहिती घेतली असता त्यांना हडपसरमध्ये मृतदेह आढळल्याचे समजले. परिसरात माहिती घेतल्यानंतर त्यांना एक प्रत्यक्षदर्शी देखील सापडला. त्यानंतर आरोपी महेश धनावडे याला ताब्यात घेऊन सखोल तपास केल्यानंतर त्याने घटनेची माहिती दिली आणि या खूनाचा उलगडा झाला. पंकजच्या एका हातावर आई आणि दुसऱ्या हातावर पंकज असे गोंदलेले होते. त्यावरून त्याच्या मृतदेहाची ओळख पटली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत