पुणे : माजी मंत्री आणि आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्याच्या कात्रजमध्ये हल्ला झाला आहे. ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी हा हल्ला केल्याचा आरोप शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी केला आहे.
उदय सामंत यांचा ताफा कात्रज चौकात पोहोचला. कात्रज मधील आदित्य ठाकरे यांची सभा संपल्यानंतर शिवसैनिक परतत असताना नेमक्या त्याचवेळी तानाजी सावंत यांच्या घराकडे निघालेल्या उदय सामंतांची गाडी तिथं पोहोचली. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी उदय सामंतांच्या गाडीची मागची काच फोडल्याचा आरोप आहे. दुसरीकडे हा हल्ला आमच्या शिवसैनिकांनी केला नाही, असं आदित्य ठाकरे आणि विनायक राऊतांनी म्हटलं आहे.
उदय सामंत हडपसरकडून कात्रज कोंढवा रोडने कात्रज चौकात आले. त्याच वेळी आदित्य ठाकरेंचा ताफा त्याच चौकाकडे येत होता. त्यामुळे शिवसैनिकांची चौकात मोठी गर्दी झाली होती. यातील काही शिवसैनिकांनी उदय सामंतांच्या गाडीला घेराव घातला. गद्दार गद्दार अशा घोषणा देत उदय सामंत त्यांच्या गाडीला घेराव घातल्याने पोलिसांनी त्यांना सुरक्षा देण्याचा प्रयत्न केला.




