पुणे : कोरोना काळात लॉकडाउनमुळे अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या. पुण्यातील कोंढवा भागात राहणाऱ्या एका इंजिनिअर तरुणाने नोकरी गेल्याच्या नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ऋषिकेश मारुती उमाप असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. कोंढव्यातील कावेरी पार्क सोसायटीत हा तरुण राहत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, कावेरी पार्क सोसायटीमध्ये ऋषिकेश मारुती उमाप हा तरूण कुटुंबियांसह राहत होता. ऋषिकेश इंजिनिअर होता. परंतु, लॉकडाउनमध्ये त्याची नोकरी गेली. त्यामुळे तो घरीच बसून होता. नोकरीच्या चिंतेने त्याला ग्रासले होते. त्यामुळे तो नैराश्यात गेला होता. दरम्यान, ऋषिकेश सोमवारी रात्री त्याच्या रूममध्ये झोपण्यास गेला. मात्र सकाळी उशिरापर्यंत तो बाहेर आला नाही. त्याच्या कुटुंबियांनी रूमच्या खिडकीतून डोकावून पाहिलं, त्यावेळी त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. ऋषिकेशने गळफास घेतल्याचे त्यांना दिसून आले. त्यानंतर कुटुंबियांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.




