सहकारी बँकेतील एजंटने मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन ३१ वर्षीय महिलेवर अत्याचार केला. ही घटना नागपूर मध्ये नंदनवन भागात घडली आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी हितेश आगासे (वय २८, रा. बाभुळबन, लकडगंज) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला मोबाइल शॉपीमध्ये काम करते. डेली कलेक्शनसाठी हितेश महिलेच्या ऑफिसमध्ये यायचा. त्यामुळे दोघांची ओळख आहे. हितेशने तिला आर्थिक मदत केली. तसेच त्याचे महिलेच्या घरी जाणे-येणे वाढले. काही दिवसांपूर्वी हितेश महिलेच्या घरी गेला असता त्याने महिलेकडे शारीरिक सुखाची मागणी केली. महिलेने नकार दिल्यानंतर मुलीला ठार मारण्याची धमकी देऊन हितेशने महिलेवर बलात्कार केला.
हितेश त्यानंतर सतत अत्याचार करायला लागला. हा छळ असह्य झाल्याने महिलेने पतीला या सर्व घटनेची माहिती दिली. त्यानंतर पतीबरोबर नंदनवन पोलिस स्टेशनमध्ये जाऊन महिलेने तक्रार नोंदवली. पोलिसांनी हितेशविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.