सिंधुदुर्ग : संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना कणकवली दिवाणी न्यायालयाने ४ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यामुळे नितेश राणे यांना पुढील दोन दिवस कणकवली पोलिस ठाण्यातील कोठडीत राहावे लागणार आहे.
न्यायालयासमोर आत्मसमर्पण केल्यानंतर नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, आरोपी नितेश राणे हे पोलिसांच्या ताब्यात असणे अत्यंत आवश्यक असल्याचे सरकारी वकील अॅड प्रदीप घरत यांनी म्हटले. त्यानंतर न्यायालयाने पोलिसांना आपले म्हणणे मांडण्यास सांगितले होते. पोलिसांना या प्रकरणाच्या तपासासाठी नितेश राणे यांची पोलीस कोठडी गरजेची आहे का, असा सवाल न्यायालयाने पोलिसांना विचारला. त्यानंतर पोलिसांचा अहवाल आल्यानंतर न्यायालयाने नितेश राणे यांच्या पोलीस कोठडी ठोठावली.
आरोपी नितेश राणे पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर आता या प्रकरणी पोलिस योग्य तो तपास करू शकणार आहेत. मात्र दोन दिवसात तपास पूर्ण न झाल्यास आम्ही ही कोठडी वाढवून मागू शकतो, असेही घरत यांनी म्हटले आहे.




