मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मुंबईच्या विशेष न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच, तुरुंगात घरचं जेवण मिळावं, यासाठी देशमुखांनी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. मात्र, त्यांना बेड आणि औषधं पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील काही दिवस तुरुंगातील जेवण घ्या, योग्य वाटलं नाही तर विचार करु, असं न्यायालयाने सांगितलं. त्यामुळे सध्यातरी अनिल देशमुख यांना इतर कैद्याप्रमाणे तुरुंगातील जेवण घ्यावे लागणार आहे.
दोन नोव्हेंबर रोजी अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांची चौकशी सुरु असून सोमवारी अनिल देशमुख यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी कोर्टानं त्यांना 29 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अनिल देशमुख यांच्या वतीने ॲड. अनिकेत निकम यांनी न्यायालयात बाजू मांडली. तर सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी ईडीकडून युक्तीवाद केला. सुनावणी दरम्यान अनिल देशमुख यांनी प्रकृतीचं कारण देत घरच्या जेवणाची मागणी केली होती. न्यायालयाने देशमुखांची ही मागणी फेटाळत देशमुखांना फटकारलं. आधी तुरुंगातील जेवण खा, ते योग्य नसल्यास विचार करू, असं न्यायालयाने सांगितलं. अनिल देशमुख यांनी प्रकृतीचं कारण दिल्यामुळे न्यायालयाने देशमुखांना तुरुंगात स्वतंत्र बेड ठेवण्याची परवानगी दिली आहे. अनिल देशमुख यांना तुरुंगातील जेवणामुळे काही समस्या उद्भवल्यास घरच्या जेवणासाठी अर्ज करावा, असं न्यायालयाने सांगितलं.




