नागपूर : विवाहित महिलेच्या अंगावर ‘आय लव्ह यू’ लिहिलेला किंवा तिच्याविषयी प्रेम व्यक्त करणारी एखादी कविता, शायरी लिहिलेला कागद फेकणे हा विनयभंगच असल्याची महत्त्वपूर्व टिपण्णी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिली आहे. अकोला जिल्ह्यातील एका विनयभंगाच्या प्रकरणावर निर्णय देताना न्यायालयाने हे मत व्यक्त केलं आहे.
२०११ साली अकोला येथील एका ५४ वर्षीय व्यक्तीवर एका ४५ वर्षीय महिलेचा विनयभंग करून तिला धमक्या देण्याचा आरोप करण्यात आला होता. पीडित महिला विवाहित असून तिला एक मुलगा आहे. आरोपीने या महिलेला एक चिठ्ठी देऊ केली. ती घेण्यास तिने नकार दिला. त्यामुळे आरोपीने ही चिठ्ठी तिच्या अंगावर फेकली आणि तो तिला ‘आय लव्ह यू’ असे म्हणाला. तसेच याबाबत कोणालाही सांगू नकोस अशी धमकी देखील त्याने महिलेला दिली होती. या प्रकरणी अकोल्यातील सिव्हिल लाईन्स पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून तपासाअंती आरोपपत्र दाखल केले.
याप्रकरणी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आरोपीला २ वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. आरोपीने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयानेसुद्धा आरोपीला दोषी ठरविले. ‘एखाद्या महिलेची अब्रू हा तिचा सगळ्या मोठा दागिना आहे. त्यामुळे तिचा विनयभंग झाला की नाही हे ठरविण्यासाठी एखादे सरसकट समीकरण लागू करता येणार नाही. अशात एखाद्या ४५ वर्षीय विवाहितेच्या अंगावर प्रेम व्यक्त करणारी कविता लिहिलेली चिठ्ठी फेकणे हा विनयभंगच आहे,’ असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
न्यायालयाने सांगितले की आरोपीवरील विनयभंगाचा आरोप सिद्ध होतो. मात्र, प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपीला २ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दहा वर्ष जुन्या या प्रकरणात आरोपीने ४५ दिवसांचा कारावास भोगला असून तेवढा पुरेसा आहे. मात्र, आरोपीची दंडाची रक्कम वाढवून ती ५० हजार इतकी करण्याचे आदेश यावेळी न्यायालयाने दिले.
कार्यालयात काम सोडून केस विंचरत बसणे हे गंभीर गैरवर्तन – मुंबई उच्च न्यायालय




