मुंबई : मुंबईतील भांडुप भागातील मॉलच्या तिसर्या मजल्यावरील कोविड रुग्णालयात मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास आग लागली. या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला. रुग्णालयातील 76 रुग्णांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना दुसर्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळी लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाची २२ पथकं दाखल झाली आहेत. रुग्णालयात अजूनही मदत व बचावकार्य सुरू आहे.
भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये हे रुग्णालय आहे. मध्यरात्री अचानक या रुग्णालयात आग लागल्यामुळं एकच खळबळ उडाली. रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. आगीनंतर या रुग्णालयातील ७६ रुग्णांना अन्यत्र हलवण्यात आलं आहे. त्यात काही कोरोना रुग्णांचाही समावेश आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
दुर्घटनेची माहिती मिळताच महापौर पेडणेकर घटनास्थळी पोहोचल्या. त्या म्हणाल्या कि, “एखाद्या मॉलमध्ये रुग्णालय असल्याचं मी प्रथमच पाहते आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल.”




