अहमदनगर : रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणात अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने बाळ बोठेचा अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यामुळे बाळ बोठेच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. आजच्या सुनावणीत अॅड. महेश तवले यांनी बाळ बोठेच्या बाजूने युक्तिवाद केला. मात्र, सत्र न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला.
बाळ बोठेंचे वकील महेश तवलेंनी या प्रकरणाचा हनी ट्रॅपशी संबंध जोडला. आणि हनी ट्रॅपमुळेच बाळ बोठेला या प्रकरणात गोवण्यात आल्याचं महेश तवले म्हणाले. बाळ बोठे पत्रकार म्हणून काम करतात. त्यांनी वृत्तपत्रात हनीट्रॅपची मालिका चालवली. या वृत्तमालिकेत त्यांनी सागर भिंगारदिवेचं नाव घेतलं. सागर भिंगारदिवे हाच हनीट्रॅपचा मास्टरमाईंड असल्याचा खुलासा त्यांनी केला. त्यामुळेच त्यांना या प्रकरणात गोवण्यात आल्याचा युक्तिवाद अॅड. महेश तवलेंकडून करण्यात आला.
मात्र, हनीट्रॅपमधून जर बाळ बोठेला फसवण्यात आलं असेल तर मग सागर भिंगारदिवे आणि बाळ बोठेमध्ये इतक्या बैठका का झाल्या? हत्याकांडाच्या दिवशी बाळ बोठे सागर भिंगारदिवेशी संपर्कात कसा? आणि त्याच वेळी बाळ बोठेने रेखा जरेंना इतके फोन कशासाठी केले? असे प्रश्न विचारत सरकारी वकील सतीश पाटील यांनी तवलेंचा युक्तिवाद खोडून काढला.
दरम्यान, बाळ बोठे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तो देशाबाहेर पळून जाऊ नये म्हणून त्याच्याविरोधात लूकआऊट नोटीसही जारी करण्यात आली होती. विमान प्राधिकरणाला तशा सूचना देण्यात आल्या होत्या.