कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आज भारत बंद पुकारला आहे. त्यामुळे देशभरात ठिकठिकाणी रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिमाण होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला चार महिने पूर्ण झाले आहेत. सकाळी शेतकऱ्यांकडून गाझीपूर सीमेवर राष्ट्रीय महामार्ग ९ रोखण्यात आला होता.
संयुक्त किसान मोर्चाचे नेते दर्शन पाल यांनी सांगितलं की आंदोलक शेतकऱ्यांकडून दूध तसंच भाज्यांचा पुरवठाही रोखण्यात येईल. दरम्यान किसान मोर्चाने शेतकऱ्यांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे. सकाळी सहा वाजता भारत बंद आंदोलनाला सुरुवात झाली असून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलन सुरु राहील अशी माहिती संयुक्त किसान मोर्चाने दिली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी अनेक ठिकाणी बॅरिकेड्स उभारले आहेत.
दरम्यान, देशातील आठ कोटी व्यापाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने आपण बंदमध्ये सहभागी नसून मार्केट सुरु राहतील, असं स्पष्ट केलं आहे.




