देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रवाश्यांकडे सामान (लगेज) नसेल तर आता भाड्यात सवलत मिळणार आहे. नागरी उड्डयन महासंचालनालयाने (DGCA) शुक्रवारी ही अधिसूचना प्रसिद्ध केली व याबाबतची माहिती दिली. याचा फायदा घेण्यासाठी प्रवाशांना तिकिट बुकिंगच्या वेळी पर्यायाबद्दल सांगावे लागेल. हा नवीन नियम कधी लागू होईल आणि भाड्यात किती सूट मिळणार, हे डीजीसीएने अद्याप स्पष्ट केलेले नाही.
DGCA ने म्हटले आहे की जे प्रवासी सामान न घेता किंवा फक्त केबिन बॅग घेऊन प्रवास करतील, अशा प्रवाशांना एअरलाइन्स स्वस्त तिकिट देऊ शकतात. तथापि, केबिन बॅगचे वजन निश्चित मर्यादेपेक्षा जास्त नसावे. सध्या, एक प्रवासी 7 किलो केबिन बॅग आणि 15 किलो चेक-इन बॅग ठेवू शकतो. अतिरिक्त वजन असल्यास वेगळे पैसे द्यावे लागतात.
भाडे शुल्काबद्दल आलेल्या फीडबॅकच्या आधारे डीजीसीएने सांगितले आहे की तिकिटात बऱ्याच अशा सेवांचा समावेश असतो, ज्यांची प्रवाशांची गरज नसते. अशा सेवा आणि त्यांचे शुल्क वेगळे करून मूलभूत शुल्क स्वस्त होण्याची शक्यता आहे. तसेच प्रवाशांना त्यांच्या सोयीनुसार सेवा निवडण्याचा पर्यायही मिळेल.
मूलभूत शुल्कातून वजा होतील हे खर्च :
- प्रवाश्याच्या पसंतीच्या आसनावर बसण्याचे शुल्क
- पाणीवगळता जेवण, स्नॅक आणि पेय शुल्क
- एअरलाइन्स लाउंज वापरण्यासाठी शुल्क
- क्रीडा उपकरणे शुल्क
- संगीत वाद्य शुल्क (म्युझिकल इन्स्ट्रुमेंट)
- मौल्यवान बॅगसाठी विशेष फी
- चेक-इन बॅगेज चार्ज
एअरलाइन्सच्या बॅगेज पॉलिसीनुसार सामान नसल्यास शेड्युल्ड एअरलाइन्सना विनामूल्य बॅगेज ऑफर द्यावी लागेल. प्रवाशांना त्यांच्या सोयीनुसार बेस फेअरसह यापैकी कोणत्याही सुविधांचा लाभ घेता येईल.




