मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात पुढील चौकशीसाठी सचिन वाझे यांना 3 एप्रिलपर्यंत NIA कोठडीत जावं लागणार आहे. हिरेन यांच्या पत्नीने वाझे यांच्यावर हिरेन यांच्या हत्येचा आरोप केला होता.
सचिन वाझेंची आज कोठडी संपत असल्याने त्यांना एनआयएच्या विशेष न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी सचिन वाझे तपासात सहकार्य करत नसल्याचं एनआयएने कोर्टाला सांगितलं. तर या प्रकरणात आपल्याला बळीचा बकरा बनवलं जात असल्याचा दावा सचिन वाझे यांनी केला.
मनसुख हिरेन हत्या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे. या दोघांना वाझेंच्या समोर बसवून तपास करायचा आहे. वाझेंच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून त्याचा रिपोर्ट यायचा बाकी आहे. तसेच वाझेंच्या गाडीतून मिळालेले पुरावे फोरेन्सिक पुराव्याशी पडताळणी करून पाहायचे आहे. डीएनए मॅच करण्यासाठी पाचही गाड्यांचे सँपल घेण्यात आले आहेत. शिवाय आरोपीने सीसीटीव्ही डीव्हीआर गायब केला असून तोही शोधायचा आहे. त्यामुळे वाझेंची कोठडी वाढवून द्यावी, अशी मागणी यावेळी एनआयएने केली.




