मुंबई : योग्य प्रकारे ‘मास्क’ परिधान करणे, हा कोरोनास प्रतिबंध करण्याचा सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे. मास्क वापरण्याबाबत मुंबई महानगरपालिकेद्वारे सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. त्याचबरोबर विना मास्क सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्यांवर २०० रुपये एवढा दंड आकारला जात आहे. ही दंडात्मक कारवाई महानगरपालिका क्षेत्रात अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबई पोलीस दल, वाहतूक पोलीस यांच्यासमवेत संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश पालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालयांना दिले आहेत.
चहल यांच्या मार्गदर्शनात महापालिकेच्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना महापालिका आयुक्तांनी वरील निर्देश दिले आहेत. या बैठकीला महापालिकेचे सह आयुक्त, उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, महापालिका रुग्णालयाचे अधिष्ठाता, सार्वजनिक आरोग्य खात्यातील वैद्यकीय अधिकारी आणि महापालिकेच्या विविध खात्यांचे अतिवरिष्ठ अधिकारी आणि मुंबई पोलीस दलाच्या आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून उपायुक्त शहाजी उमप उपस्थित होते.
या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे :
- विना मास्क विषयक दंडात्मक कारवाई आता पोलीस देखील करणार
- मुंबई महापालिकेच्या सर्व २४ विभागांच्या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक परिसरांमध्ये विना मास्क वावरणाऱ्या नागरिकांवर प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी रुपये २०० याप्रमाणे दंडात्मक कारवाई यापूर्वीच सुरु करण्यात आली आहे.
- ही दंडात्मक कारवाई आता अधिक कठोरपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले. यासाठी प्रभाग स्तरीय नियोजन करण्याचे व त्यासाठी संबंधित नगरसेवकांचे सहकार्य घेण्याचे निर्देश देण्यात आले.
- दंडात्मक कारवाई अधिक प्रभावीपणे करण्यासाठी संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. यानुसार संबंधित संस्थांचे प्रतिनिधी व महापालिका कर्मचारी यांच्याद्वारे नियमितपणे कारवाई सुरु आहे.
- विना मास्क विषयक दंडात्मक कारवाईसाठी मुंबई पोलीस दल व वाहतूक पोलीस यांच्यासमवेत संयुक्त कारवाई नियमितपणे करणार.
- मुंबई पोलीस दल व वाहतूक पोलीस यांच्यासमवेत संयुक्त कारवाई योग्यप्रकारे व्हावी, याकरिता महापालिकेच्या सर्व २४ विभागांच्या स्तरावर संयुक्त कारवाई आराखडा तयार करण्याचे व त्यानुसार अंमलबजावणी करण्याचे निर्देश.
- दुकानदार, विक्रेते, दुकान-उपहारगृहे इत्यादी ठिकाणी काम करणारे विक्रेते व कर्मचारी, मॉर्निंग वॉकला जाणारे नागरिक इत्यादींवर देखील ‘विना मास्क’ विषयक कारवाई करण्याचे निर्देश.
- आवश्यकतेनुसार संबंधित कलमांन्वये कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश.




