Pratap Sarnaik Unveils Major Reforms for ST
महाराष्ट्र मुंबई

एसटी कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या ७ तारखेला मिळेल पगार, प्रताप सरनाईक यांनी केल्या ‘या’ महत्त्वाच्या घोषणा

मुंबई : एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या ७ तारखेला वेतन मिळेल, याचे स्पष्ट आणि ठोस आश्वासन दिले. त्यांनी सांगितले की, “आर्थिक अडचणी असूनही, कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार नाही याची जबाबदारी माझी असेल.”

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

एसटी मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात सरनाईक यांनी पदभार स्वीकारला. यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, परिवहन आयुक्त विवेक भीमनराव तसेच संचालक मंडळाचे सदस्य आणि विविध खात्यांचे प्रमुख उपस्थित होते.

सरनाईक म्हणाले की, “आर्थिक अडचणींमुळे मार्च महिन्याचे केवळ ५६% वेतन देता आले, हे अत्यंत दुर्दैवी आहे. परंतु पुढे असे होणार नाही. मी स्वतः अर्थ खात्याशी संपर्क साधून कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळावा यासाठी प्रयत्न करीन.”

राज्यातील एसटीच्या जागा खाजगी विकासकांद्वारे विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात ६६ जागांसाठी निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. जिल्हा, तालुका आणि ग्रामीण भागातील जागांचा यात समावेश असेल.

सध्या जुन्या बसेस स्क्रॅप करून नवीन बसेस ताफ्यात दाखल केल्या जात आहेत. यंदा २६४० नवीन “लालपरी” बसेस सेवेत येणार असून, ११३ आगारांमध्ये ८०० हून अधिक बसेस आधीच कार्यरत आहेत. पुढील टप्प्यात ३ हजार नवीन बसेससाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. ग्रामीण व दुर्गम भागांसाठी मिडी बसेस आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी २०० वातानुकूलित शयनयान बसेस घेतल्या जाणार आहेत.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, पॅनिक बटण
प्रवाशांच्या विशेषतः महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व बसस्थानकांवर आणि नवीन बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक बटण आणि अधिक सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. तसेच बसस्थानकांवरील शौचालये अत्याधुनिक, स्वच्छ आणि निर्जंतुक असतील.

एसटी – महाराष्ट्राची ‘लोकवाहीनी’
“राज्यातील १३ कोटी जनतेला सुरक्षित व किफायतशीर सेवा देणारी एसटी ही महाराष्ट्राची लोकवाहीनी आहे,” असे गौरवोद्गार सरनाईक यांनी काढले. त्यांनी स्पष्ट केले की एसटीचे आर्थिक पुनरुज्जीवन, दर्जेदार सेवा आणि कर्मचारी हित लक्षात घेऊन धोरणात्मक निर्णय घेतले जातील.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत