पुणे : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित ‘गुरुवर्य शंकरराव कानिटकर पुरस्कार’ यंदा कीर्तनकार आणि समाजप्रबोधनकार ह.भ.प. श्री. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांना प्रदान करण्यात आला. छत्रपती शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
निवृत्ती महाराज देशमुख यांनी आपल्या खास विनोदी आणि सडेतोड शैलीतून समाजप्रबोधन, लोकशिक्षण आणि वारकरी संप्रदायाचे महत्त्व जनमानसापर्यंत पोहोचवले आहे. शिक्षणशास्त्रातील पदवी मिळवल्यानंतर त्यांनी वडिलांकडून मिळालेली कीर्तन परंपरा समर्थपणे पुढे नेत, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरून समाज जागवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.
केवळ प्रबोधनापुरते न थांबता, त्यांनी सामाजिक कार्यातही आपला ठसा उमटवला आहे. गरजू, अनाथ व निराधार मुलांसाठी निवासी शाळा स्थापन करून त्यांचे शिक्षण व पालनपोषणाची जबाबदारी त्यांनी उचलली आहे. त्यांच्या या सामाजिक योगदानाची दखल घेत प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने त्यांचा सन्मान केला.
या कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, श्री विघ्नहरी देव महाराज, प्रा. गजानन एकबोटे (कार्याध्यक्ष, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी), डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, निवेदिता एकबोटे, प्रा. शामकांत देशमुख, प्रा. सुरेश तोडकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी सांगितले की, “ह.भ.प. निवृत्ती महाराजांचे कार्य समाजासाठी दीपस्तंभासारखे आहे. त्यांच्या विचारांमुळे आणि कार्यामुळे नवीन पिढीला प्रेरणा मिळत आहे. समाजाच्या प्रत्येक थरात प्रबोधन पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न हे आजच्या काळातील एक मार्गदर्शक उदाहरण आहे.”
या पुरस्काराने निवृत्ती महाराजांचे समाजासाठी दिलेले योगदान अधोरेखित झाले असून, त्यांच्या कार्याला मिळालेली ही मान्यता महाराष्ट्रातील सर्व प्रबोधनकारांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.