सोलापूर : सोलापुरातील नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील उद्या (28 जानेवारी) काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईत काँग्रेस भवनमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. मोहिते पाटील अगोदर शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. आता ते काँग्रेसमध्ये जाणार आहेत. डॉ धवलसिंह यांनी स्वत: या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
भाजपसह असलेल्या युतीत शिवसेनेला राहावे लागल्याने धवलसिंह यांना शिवसेनेत अपेक्षित जबाबदारी मिळाली नव्हती. त्यामुळे डॉ. धवलसिंह यांनी शिवसेना सोडून आपल्या जनसेवा संघटनेचे काम पाहणे सुरु केले होते. यानंतर विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धवलसिंह यांना आपल्याकडे वळवलं होतं. त्यांनी गेल्या विधानसभेत राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम जानकर यांचा जोरदार प्रचार केला होता. अतिशय कमी मतांच्या फरकाने भाजपच्या राम सातपुते यांचा विजय झाला होता. मात्र यानंतर राष्ट्रवादीत धवलसिंह यांना दुर्लक्षित केल्याचं लक्षात येऊ लागलं, त्यामुळे आता त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
धवलसिंह मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे सोलापुरात काँग्रेस पक्ष अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. तसेच मागच्या महिन्यात नरभक्षक बिबट्याला मारल्यामुळे ते चर्चेत आले होते. त्याचीही त्यांना त्यांच्या इमेज बिल्डिंगमध्ये मदत झाली होती.




