पंढरपूर : पंढरपूर मधील बाजारपेठेमध्ये आज पहाटे चारच्या सुमारास भोसले चौकातील गणपती मंदिराच्या मागील बाजूस दुकानांना अचानक आग लागली. अनेक दुचाकी जाळून खाक झाल्या असून कपड्यांचे गोडावूनही आगीत जळून खाक झाले आहे. माजी नगराध्यक्ष नागेश भोसले यांनी आगीची माहिती मिळताच कार्यकर्त्यांच्या मदतीने व अग्निशामक दलाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळवले.
मिळालेल्या माहिती नुसार, शहरातील बाजारपेठ असलेल्या कर्नल भोसले चौक येथे आज पहाटे चारच्या सुमारास अचानक काही दुकानांना आग लागली. अग्निशामक दलाने दोन तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळवले . पहाटेच्या सुमारास भोसले चौकातील गणपती मंदिराच्या मागील बाजूस असलेले गॅरेज , कपड्यांच्या गोडावूनला आग लागली होती . यात गॅरेज मधील दुरुस्तीला आलेल्या अनेक दुचाकी जाळून खाक झाल्या असून काशीकपदी समाजाचे कपड्यांचे गोडावूनही आगीत भस्मसात झाले आहे .
माजी नगराध्यक्ष नागेश भोसले यांनी आगीची माहिती मिळताच तातडीने नगरपालिकेला निरोप देत कार्यकर्त्यांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न सुरु केला . वेळीच आगीची माहिती मिळाल्याने लोकवस्तीत आग पसरण्याचा धोका टाळला . ही आग कशामुळे लागली याची अद्याप माहिती मिळली नसली तरी पोलिसांनी तपास सुरु केला आहे .




