रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ‘हजेरीसहायक’ या पदासाठीच्या परीक्षेसाठी मराठीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. राज्य सरकारच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झालं आहे. मराठीसह अन्य १६ भाषांतून ही परीक्षा होणार आहे. मराठी आणि कोंकणी भाषेतून परीक्षा देण्याची संधी मिळणार असल्याने परीक्षार्थींनी समाधान व्यक्त केले.
RBI ने नुकतीच ८४१ हजेरीसहायक पदांच्या भरती प्रक्रियेला मंजुरी दिली. त्यापैकी मुंबई विभागात २०२ आणि नागपूर विभागात ५५ पदांची भरती प्रकिया राबवण्यात येणार आहे. या सर्व परीक्षार्थींना मराठीतून परीक्षा देता येईल. परीक्षा केंद्रे नागपूर विभागात नागपूर, अमरावती आणि चंद्रपूर येथील केंद्रावर ही परीक्षा होईल. तसेच मुंबई विभागात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, औरंगाबाद, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी आणि सातारा केंद्रांवर परीक्षा होईल.
परीक्षार्थींनी केंद्रीय स्तरावरील परीक्षा मराठीतून घेण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत राज्य सरकारच्या मराठी विभागाने मराठीतून परीक्षा घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार RBI मधील हजेरीसहायक या पदाची परीक्षा देण्यासाठी मराठीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. ही परीक्षा १२० गुणांची असून परीक्षार्थींना ९० मिनिटे मिळतील. ही परीक्षा ऑनलाइन होणार आहे. भाषा प्रावीण्य चाचणी परीक्षा ९ व १० एप्रिल रोजी देशातील १७३ परीक्षा केंद्रांवर होईल.




