woman repeatedly abused by three friends, shocking revelation after victim's suicide
क्राईम महाराष्ट्र सोलापूर

खळबळजनक! विवाहितेवर तीन मित्रांकडून वारंवार अत्याचार, पीडितेच्या आत्महत्येनंतर झाला धक्कादायक खुलासा…

सोलापूर : एका विवाहित महिलेवर तीन मित्रांनी वारंवार अत्याचार करून तिला शारिरिक आणि मानसिक त्रास दिल्याची भयंकर घटना समोर आली आहे. तसेच, याबाबत कोणाला सांगितल्यास तुझ्या दोन मुलांना जीवे मारू, अशी धमकी देखील या नराधमांनी तिला दिली होती. या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने सोलापूर जिल्हा हादरून गेला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. मोबाईल हिस्ट्रीवरुन आरोपी अनैतिक संबंध ठेवण्यासाठी विवाहित महिलेला त्रास देत असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला तिचे पती व दोन मुलांसह पुण्यात राहत होती. यातील एक आरोपी त्यांचा नातेवाईक असल्याने नेहमी पुणे येथे विवाहितेचा पती घरी नसतानाही ये-जा करत असायचा. परंतु तो नातेवाईक असल्याने पीडितेच्या पतीला कोणताही संशय आला नव्हता. महिलेवर अत्याचार करणारे तिघे सुरज सुभाष नकाते (वय २९), तोसिफ चाँदसो मुजावर (वय २४), शुभम मोहन नकाते (वय २४) हे आरोपी एकमेकांचे खास मित्र आहेत. हे तिघेही आरोपी सातत्याने या महिलेस अनैतिक संबंध ठेवण्याबाबत त्रास देत होते.

दरम्यान, पीडित महिला या सततच्या त्रासाला कंटाळली होती, तसेच तिला बदनामीची भीती वाटत होती. त्यामुळे २१ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वाजता पीडित महिला तिच्या आईला भेटण्यासाठी घरी जावून येते असे सांगून घराबाहेर पडली होती. संध्याकाळी ४  वाजताच्या सुमारास गावातील एका व्यक्तीने पीडित महिलेच्या पतीस फोन करून सांगितले की, तुमच्या पत्नीचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. त्यानंतर महिलेचा पती तात्काळ घटनास्थळी पोहोचला, त्यांना तलावाच्या काठावर पत्नीचा मोबाईल व चप्पल दिसून आली. लोकांनी महिलेला बाहेर काढून प्राथमिक उपचारासाठी आरोग्यकेंद्रात दाखल केले होते. मात्र, डॉक्टरांनी तपासून महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

मोबाइल हिस्ट्रीवरून झाला खुलासा :
घटनेची माहिती मिळताच मंगळवेढा पोलिसांनी विवाहित महिलेचा मोबाईल ताब्यात घेऊन तपास सुरू केला. त्यांनी मृत महिलेच्या मोबाईलमधील चॅटिंग हिस्ट्री चेक केली, त्यावरून त्यांना समजले की हे तिघे आरोपी सातत्याने या महिलेस अनैतिक संबंध ठेवण्याबाबत त्रास देत होते. आरोपी तिला वारंवार शारिरिक आणि मानसिक त्रास देत असल्याने कंटाळून तिने तलावात उडी मारून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.

मृत महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोलापूर जिल्ह्याचे नुतन पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार डी. वाय.एस.पी. विक्रांत गायकवाड, पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांनी तपासाची चक्रे फिरवून तिन्ही आरोपींना तात्काळ अटक केली. तपासिक अंमलदार पोलिस उपनिरिक्षक पुरुषोत्तम धापटे यांनी आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तोसिफ मुजावर याला दोन दिवस, सुरज नकाते याला तीन दिवस व शुभम नकाते याला चार दिवस अशी पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी अधिक तपास मंगळवेढा पोलीस करत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत