आजकाल वाढते प्रदूषण सार्वजनिक आरोग्य धोक्यात येण्याचे मोठे कारण ठरले आहे. हवेत पसरणारे प्रदूषण फुफ्फुसांसाठी अत्यंत घातक आहे. प्रदूषित हवेत श्वसन केल्याने, प्रदूषणाच्या लहान कणांमुळे आपल्या फुफ्फुसांचे मोठे नुकसान होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत फुफ्फुसांना प्रदूषणापासून वाचवण्यासाठी काही गोष्टी अत्यंत फायदेशीर मानल्या जातात, त्यामुळे फुफ्फुसांना प्रदूषणापासून वाचवण्यासाठी आपण काही अन्नपदार्थांचा आहारात समावेश करायलाच हवा.
फुफ्फुसांचा प्रदूषणापासून बचाव करतील हे अन्नपदार्थ :
जवस :
यामध्ये फायटोएस्ट्रोजेन्स आणि ओमेगा-३ फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असतात. फायटोस्ट्रोजेन्समध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे दमा आणि प्रदूषणामुळे होणाऱ्या ऍलर्जीपासून संरक्षण करतात. प्रदूषणापासून सुरक्षित ठेवण्यासाठी जवस सर्वात प्रभावी ठरते. त्यामुळे प्रदूषणाचे दुष्परिणाम टाळायचे असतील तर जवसाचे नियमित सेवन सुरू करा.
गूळ :
फुफ्फुसांना प्रदूषणापासून वाचवण्यासाठी गूळ खूप फायदेशीर मानला जातो. गुळामध्ये असलेले अँटी-एलर्जिक घटक फुफ्फुसांसाठी चांगले असतात. त्यात लोहाचे प्रमाण भरपूर असते. लोह रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी सामान्य करते, ज्यामुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढते. दररोज गूळ खाल्ल्याने हवेत पसरणाऱ्या प्रदूषणाचा आरोग्यावर फारसा परिणाम होत नाही, हेही अभ्यासातून सिद्ध झाले आहे.
ऑलिव्ह ऑइल :
ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन-ई आढळते, जे फुफ्फुसाची समस्या दूर करून त्याचे कार्य सुधारते. ऑलिव्ह ऑइलमध्ये आढळणारे फॅटी ऍसिड शरीरावरील सूज कमी करते, याशिवाय, प्रदूषणामुळे होणार्या हृदयरोगाच्या समस्यांपासून देखील संरक्षण करते.
टोमॅटो :
प्रदूषणाचा परिणाम टाळण्यासाठी आहारात टोमॅटोचा समावेश करा. यामध्ये लाइकोपीन नावाचे अँटीऑक्सिडंट असते, जे प्रदूषणामुळे होणाऱ्या श्वसनाच्या समस्यांपासून संरक्षण करते.
पाणी :
श्वासाद्वारे शरीरात गेलेले विषारी घटक बाहेर काढण्यासाठी पाणी खूप महत्वाचे आहे. त्यामुळे पाणी पिण्यास विसरू नका. दिवसातून सुमारे 4 लिटर पाणी प्या. घराबाहेर पडल्यावरही पाणी प्या. यामुळे शरीरातील ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रकारे होईल आणि वातावरणातील विषारी वायू रक्तापर्यंत पोहोचले तरी कमी नुकसान होईल.
लसूण :
लसणात प्रतिजैविक घटक असतात, जे प्रदूषणाशी लढण्याची क्षमता वाढवतात. त्यामुळे तुमच्या आहारात लसणाचाही समावेश करा.
व्हिटॅमिन-सी :
व्हिटॅमिन-सी आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. हे शरीरातील फ्री रॅडिकल्स काढून टाकते. शरीरात व्हिटॅमिन-ई पुन्हा निर्माण करण्यासाठी देखील व्हिटॅमिन-सी खूप उपयुक्त आहे. शरीरातील व्हिटॅमिन-सीची पातळी राखणे फुफ्फुसांसाठी खूप महत्वाचे आहे. शरीराला दररोज 40 मिलीग्राम व्हिटॅमिन-सीची आवश्यकता असते. राजगिऱ्याच्या पानांची भाजी, शेवगा, ओवा, कोबी आणि सलगम या हिरव्या भाज्या व्हिटॅमिन-सीच्या चांगल्या स्रोत मानल्या जातात. लिंबू, पेरू, आवळा आणि संत्र्यामध्येही हे जीवनसत्व आढळते. यासाठी आंबट फळांचे अधिकाधिक सेवन करायला हवे.
हर्बल टी : वजन कमी करण्यापासून ते निरोगी राहण्यापर्यंत, हर्बल टी आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. यामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. यासोबतच प्रदूषणामुळे होणार्या ऍलर्जीपासूनही संरक्षण मिळते. तुळस, आले आणि लिंबाच्या रसाच्या मदतीने तुम्ही हर्बल टी घरीदेखील बनवू शकता.




