कोरोना व्हायरसवरील पहिली लस तयार झाली असून ती आज लाँच करण्यात आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आज असा दावा केला आहे. ते पुढे असंही म्हणाले की, मला माहित आहे की, ही लस प्रभावी आणि रोग प्रतिकारशक्ती निर्माण करणारी आहे. ही लस रशिया सरकारच्या गामालेया रिसर्च इन्स्टिट्यूटने तयार केली आहे.
ही जगातील पहिली लस असल्याचं म्हटलं जात आहे. वृतसंस्था रॉयटर्सने म्हटल आहे की, पुतीन यांच्या मुलीला ही लस देण्यात आली आहे. पुतीन यांनी त्यांच्या मुलीवर या लसीचे सकारात्मक परिणाम दिसत असल्याचं सांगितलं आहे. बुधवारी (१२ ऑगस्ट) रशिया आपली ही लस रजिस्टर करेल असं सांगण्यात येत होतं. मात्र, आजच (११ ऑगस्ट) सकाळी पहिली कोरोना व्हायरस लस लाँच केली आहे.
या महिन्यात ही लस डॉक्टरी पेशाशी संबंधित लोकांना दिली जाणार आहे. रशियन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, गामालेया रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक अलेक्झेंडर गिंट्सबर्ग यांच्यासह संस्थेच्या संशोधकांनी स्वतःवर लसीची चाचणी केली आहे. या लसीने सर्व चाचण्या पूर्ण केल्या आहेत आणि रशियन अधिकारी ही लस लोकांना देणं उपयुक्त असल्याचं मानत आहेत. आता ही लस लाँच केल्यानंतर या महिन्यात शक्य तितक्या लवकर डॉक्टरांवर चाचणी करून रशियाची देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवण्याची योजना आहे.




