अमेरिका : अमेरिकेच्या पेन्सिलव्हेनिया भागात महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. बर्फामुळे अंधुक वातावरण निर्माण झाल्याने समोरचं काहीही दिसू न शकल्यानं जवळपास ६० गाड्या एकमेकांवर आदळून हा अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा मृत्यू तर २४ हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी स्चुयलकिल काउंटीमध्ये महामार्गावर हा अपघात घडला. एकमेकांवर आदळलेल्या बऱ्याचशा गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला आहे. बर्फवृष्टीमुळे अंधुक वातावरण पसरल्याने या गाड्या एकमेकांवर आदळल्या. यावेळी आपला जीव वाचवण्यासाठी गाड्यांतील चालक आणि प्रवाशांनी गाड्या रस्त्यातच सोडून पळ काढला. हा संपूर्ण रस्ता डोंगराळ भागातील असून बचाव मोहीम सुरू आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, स्चुयलकिल काउंटीमध्ये ही दुसरी सर्वात मोठी घटना आहे. या घटनेच्या व्हिडिओमध्ये ट्रॅक्टर-ट्रेलर आणि कार घसरून एकमेकांवर आदळताना दिसत आहेत. अपघातामुळे काही वाहनांनी पेट घेतल्याचं देखील दिसत आहे. अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आलं. सकाळी १०.३० वाजल्याच्या सुमारास हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच त्वरित आजूबाजूचे रस्ते बंद करण्यात आले.




