तैवान आणि चीनमध्ये काही काळापासून कमालीचा तणाव आहे. आता तैवानचे उपराष्ट्रपती लाइ चिंग टे यांनी चीनला थेट शब्दांमध्ये इशारा देत आपली मर्यादा ओलांडण्याची चूक करु नका असं म्हटलं आहे. चीनची विमाने अनेकदा तैवानच्या हवाई हद्दीचे उल्लंघन करताना दिसत आहे. चीनची लढाऊ विमाने मागील काही आठवड्यांमध्ये तीन वेळा तैवानच्या हवाई हद्दीत घिरट्या घालून आली आहेत.
तैवानचे उपराष्ट्रपती लाइ चिंग टे यांनी ट्विटवरुन चीनला इशारा दिला आहे. “स्वत:ची मर्यादा ओलांडू नका. चीनने आज (गुरुवारी) पुन्हा तैवानच्या एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोनमध्ये आपले फायटर जेट उडवले. त्यांनी अशाप्रकारची कोणतीही चूक करु नये. तैवानला शांतता हवी आहे मात्र आम्ही आमच्या लोकांचा बचाव करू,” असं लाइ चिंग टे यांनी ट्विट करत म्हटलं आहे.
Don’t cross the line. China again flew fighter jets into Taiwan’s Air Defense Identification Zone today. Make no mistake, Taiwan wants peace but we will defend our people.
— 賴清德Lai Ching-te (@ChingteLai) September 10, 2020
तैवान हा आपलाच प्रदेश असल्याचा दावा चीन करतो. लष्करी बळाच्या मदतीने या क्षेत्रावर आमचाच ताबा असल्याचा दावा चीनने अनेकदा केला आहे. चीनच्या या खुरापतींमुळे या क्षेत्रात अशांतता असल्याचे तैवानचे म्हणणे आहे. संपूर्ण जगाने एकत्र येऊन चीनला यासंदर्भात उत्तर द्यावे असंही तैवानने म्हटलं आहे




