मुंबई : प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक जोडी नदीम- श्रवण यांच्यातील श्रवण राठोड यांचं कोरोनामुळे निधन झालं. श्रवण यांना दोन दिवसांपूर्वी एस. एल. रहेजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. ते व्हेंटिलेटवर होते.
श्रवण यांना मधुमेहाचा त्रास होता, त्यातच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या फुफ्फुसांनाही बरेच इन्फेक्शन झाले होते. त्यातच हृदयाशी संबंधित समस्या निर्माण झाल्या. यासंबंधीचे उपचारही त्यांच्यावर सुरू होते. मात्र उपचारांना यश आले नाही आणि अखेर त्यांचे निधन झाले.
Our Music community and your fans will miss you immensely #ShravanRathod ji Rest in peace ?Respect and Prayers???
— A.R.Rahman #99Songs ? (@arrahman) April 22, 2021
नदीम- श्रवण या संगीतकार जोडीचा १९९० च्या दशकामध्ये बॉलिवूडमध्ये दबदबा होता. नदीम सैफी मित्र श्रवण राठोड यांच्यासोबतीने गाण्यांना चाली लावायचे. त्यांनी संगीत दिलेल्या ‘आशिकी’ सिनेमातील सर्व गाणी लोकप्रिय झाली. हा सिनेमा आणि त्यातील गाणी त्या काळात सुपर हिट होती. सगळ्यांच्या तोंडी या सिनेमाची गाणी होती. या सिनेमामुळे ही जोडी एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. या संगीतकार जोडीने ‘साजन’, ‘सडक’, ‘दिल है की मानता नही’, ‘साथी’, ‘दिवाना’, ‘फूल और काँटे’, ‘राजा हिंदुस्थानी’, ‘जान तेरे नाम’, ‘रंग’, ‘राजा’, ‘धडकन’, ‘परदेस’, ‘दिलवाले’, ‘राज’ अशा अनेक सिनेमांसाठी संगीत दिग्दर्शन केले होते.




