अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल केला आहे. बिहारच्या पाटण्यातील राजीव नगर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सध्या सुशांत सिंहच्या आत्महत्येचा मुंबई पोलीस तपास करत आहेत. मात्र मुंबई पोलिसांच्या तपासावर मला विश्वास नाही, असे सुशांतच्या वडिलांचे म्हणणं आहे. त्यामुळे त्यांनी पाटणा पोलिसांना याबाबतची चौकशी करण्याची विनंती केली आहे.
सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहे. के.के. सिंह यांच्या तक्रारीनुसार, रियाने सुशांतला फसवलं. तिने त्याच्याकडून पैसे घेतले. तसेच त्याला कुटुंबापासून पूर्णपणे वेगळे केले. त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले, असे ते म्हणाले. या तक्रारीनुसार रियाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटण्यातील राजीव नगर पोलीस ठाण्यात रियावर आयपीसी 341, 342, 380, 406, 420, 306 या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचा तपास वांद्रे पोलीस, सायबर सेल, फॉरेन्सिक विभाग आणि मुंबई क्राईम ब्रांचकडून होत आहे.सुशांतच्या आत्महत्येच्या चौकशीसाठी पाटणाचे पोलीस अधीक्षक उपेंद्र शर्मा यांनी राजीव नगरचे ठाण्याचे प्रभारी यांना मुख्य तपास अधिकारी बनवण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समितीला मुंबईत पाठवण्यात आले आहे. ही टीम मुंबई पोलिसांसोबत चौकशी करणार आहे.




