उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका पतीने आपल्या 26 वर्षीय पत्नीची गळा चिरून हत्या केली. त्याचदिवशी गुन्हेगार पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी पत्नीने उपवास केला होता. हत्या केल्यानंतर गुन्हेगार पती पळून गेला.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण कुशीनगरच्या रामकोला पोलीस स्टेशन परिसरातील देवरिया बाबू गावचे आहे. 28 वर्षीय राजगीर मिस्त्री वीरबल याचे गुजरातमधील एका महिलेशी अवैध संबंध होते. काही दिवसांपूर्वी त्याने आपल्या प्रेयसीला घरी आणले होते आणि त्याची पत्नी शीलाला सांगितले होते की ती त्याची दुसरी पत्नी आहे आणि तिला सर्वांनी स्वीकारले पाहिजे. हे ऐकल्यानंतर शीलाच्या पायाखालची जमीन सरकली. याला पत्नी शीला यांनी जोरदार विरोध केला होता.
दरम्यान, पत्नीने विरोध केल्यानंतर वीरबलने आपल्या प्रेयसीला परत गुजरातला नेऊन सोडले. पण त्याच्या डोक्यात पत्नीबद्दल राग होता. त्याने कुशीनगरला परतल्यानंतर पत्नीवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. दारूच्या नशेत तो दररोज शीलाला निर्दयीपणे मारहाण करायचा. गुरुवारी (९ सप्टेंबर) शीलाने आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी सकाळपासून तीज व्रत ठेवले होते. त्याच रात्री तिचा पती वीरबलने तिची हत्या केली. वीरबलची आई वीरबलच्या दोन लहान मुलांसह व्हरांड्यात झोपली होती. मध्यरात्री वीरबल झोपेतून उठला आणि पत्नीचा गळा चिरून घटनास्थळावरून पळून गेला.