लखनौ : आग्य्रात एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्न सोहळ्यात जेवण बनवणाऱ्या मदतनीस महिलेवर कॅटररसह पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. रविवारी हा प्रकार घडल्यानंतर पीडित महिलेला गंभीर अवस्थेत रस्त्यावर फेकून आरोपी पळून गेले. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
पीडित महिला छोट्या समारंभांमध्ये जेवण बनवण्यासाठी मदतनीस म्हणून काम करते. आग्र्यातील संबंधित लग्न सोहळ्यात पुरी तळण्याच्या कामासाठी ती गेली होती. लग्न सोहळ्यानंतर आणखी काम मिळवून देण्याच्या बहाण्याने कॅटररसह दुसऱ्या एका व्यक्तीने पीडित महिलेला निर्जन स्थळी नेले. तिथे आणखी तिघेजण आधीच उपस्थित होते. या पाच जणांनी महिलेवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर महिलेला रस्त्यावर फेकून आरोपी पळून गेले.
काही वेळाने शुद्ध आल्यानंतर पीडितेने पोलिस स्थानकात जाऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पीडित महिलेच्या पतीने तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन महिलेची वैद्यकीय चाचणी केली. तिला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून इतरांचा शोध घेण्यात येत आहे.




