उत्तरप्रदेश : एका अल्पवयीन दलित मुलीवर ५ जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशच्या मोरादाबाद येथील शाळेत १२ वर्षीय मुलीवर मुख्याध्यापकांच्या कार्यालयातच सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे. एवढेच नाही तर याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल देखील केला. मुलीच्या शेजारणीने हा व्हिडिओ पाहिल्यानंतर घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ मे रोजी मोरादाबादमधील शाळेत ही घटना घडली होती. नराधमांनी पीडित मुलीला सॉफ्ट ड्रिंक मधून गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर बलात्कार केला. या घटनेचा व्हिडिओही बनवला. हा व्हिडिओ जेव्हा समाजमाध्यमांवर व्हायरल झाला, तेव्हा पीडित मुलीच्या शेजारणीने हा व्हिडिओ पाहिला, त्यानंतर सोमवारी १९ मे ला तिने पीडितेच्या आईला याबद्दल सांगितले. पीडितेच्या आईने ताबडतोब पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला आणि मंगळवारी सायंकाळपर्यंत पाचही आरोपींना अटक करण्यात आली.
पोलिसांना पीडितेने सांगितले की, तिचे शेजारी आणि स्थानिक शाळेतील विद्यार्थी असलेल्या मुलांनी तिला काहीतरी विकत घेण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्यांनी तिला जवळच्या ज्युनियर हायस्कूलमध्ये नेले. एकाने त्याच्या वडिलांकडून जे शाळेचे चौकीदार आहेत, त्यांच्याकडून चोरलेल्या चावीचा वापर करून शाळेच्या इमारतीत प्रवेश केला. त्यानंतर तिला आत नेऊन गेट बंद केले. त्यानंतर मुख्याध्यापकांच्या कार्यालयात नेले आणि तिला मादक पेय पाजले. मुलगी बेशुद्ध पडल्यावर त्यांनी तिच्यावर बलात्कार केला आणि ते सर्व रेकॉर्ड देखील केले. घटनेनंतर तिने पालकांना काही सांगितले तर तिला मारण्याचीही धमकी त्या नराधमांनी दिली होती.
पीडितेच्या आईने सांगितले की, ‘माझी मुलगी अनेक दिवसांपासून नैराश्यात होती, पण तिने मला काहीही सांगितले नाही. मी व्हिडिओ पाहिल्यानंतर मला सर्व समजले.’ या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. गुन्ह्यातील पाचही आरोपी अल्पवयीन असून त्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.




