नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियन खेळाडू अँड्र्यू टायने IPL 2021 मधून माघार घेतल्यानंतर आता अॅडम झॅम्पा आणि केन रिचर्डसन यांनीही स्पर्धेतून माघार घेतली आहे. भारतातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या भीतीने या तिन्ही खेळाडूंनी या स्पर्धेतून आपली नावे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. अॅडम झॅम्पा आणि केन रिचर्डसन हे दोघेही IPL मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) चे खेळाडू आहेत.
कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे भारतात परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. त्यामुळे आता हळूहळू खेळाडू या स्पर्धेतून नावे मागे घेत आहेत. सनरायझर्स हैदराबादशी सामना झाल्यानंतर दिल्ली कॅपिटलचा स्टार फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले. आता रिचर्डसन आणि झॅम्पा हे आरसीबीचे खेळाडूही मायदेशी परतण्यास तयार आहेत. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी हा मोठा धक्का आहे.




