बीसीसीआयचे अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्यावर आज (गुरुवारी) दुसऱ्यांदा अँजिओप्लास्टी झाली. सौरव गांगुलीच्या हृदयातील धमन्यांमध्ये आणखी दोन स्टेंट्स बसवण्यात आले आहेत. गांगुली यांची 26 दिवसांत दुसऱ्यांदा हृदयविकाराची यशस्वी शस्त्रक्रिया झाली. अँजिओप्लास्टीनंतर सौरवची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले असून त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉ देवी शेट्टी आणि अश्विन मेहता यांच्या उपस्थितीत सौरवचे कौटुंबिक डॉक्टर डॉ. आफताब खान यांनी हे ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडले.
अँजिओप्लास्टीनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सौरव यांना पाहण्यासाठी रुग्णालयात दाखल झाल्या. त्यांनी सौरवशी संवाद साधल्याचे सांगितले. ते ठीक आहेत आणि मी त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देते, असंही त्या म्हणाल्या. अपोलो हॉस्पिटलच्या सूत्रांनी सांगितले की सकाळी सौरवचा एंजियोग्राम करण्यात आला. त्याच्या रिपोर्टच्या आधारे अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला.




