पुणे : पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपरजायंट्स हे संघ आज संध्याकाळी 7:30 वाजता आमनेसामने येतील. हा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, (MCA) पुणे येथे होणार आहे. दोन्ही संघांकडे महान खेळाडूंची फौज आहे. यापूर्वी पंजाबने चेन्नईविरुद्धचा सामना जिंकून जोरदार पुनरागमन केले आहे. तर दुसरीकडे, लखनौने हंगामाच्या सुरुवातीपासूनच चांगली कामगिरी केली आहे.
प्रत्येक हंगामात पंजाबची एकच समस्या असते, ते काही मोठे सामने जिंकतात आणि त्यानंतर काही सामने सहज हरतात आणि आयपीएलमधून बाहेर पडतात. कर्णधार मयांक अग्रवालला संघाला या समस्येतून बाहेर काढावे लागणार आहे. यासोबतच खेळाडूंनाही त्यांच्या जबाबदारीचे भान ठेवावे लागेल. गोलंदाजांना नियंत्रणासह गोलंदाजी करावी लागेल. अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव या जोडीने सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट्स घेतल्यास पंजाबसाठी सामना सोपा होऊ शकतो. लखनौची फलंदाजीची फळी मजबूत आहे, त्यामुळे पॉवर प्लेमध्ये जर त्यांच्या फलंदाजांनी जास्त धावा केल्या तर त्यांना रोखणे फार कठीण जाईल.
लखनौ सुपर जायंट्स सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. दुष्मंथा चमीरा आणि आवेश खानसारखे गोलंदाज फलंदाजांना मोकळेपणाने खेळण्याची संधी देत नाहीत. 145/kmph पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करत आतापर्यंत चमीरा संघासाठी उपयुक्त ठरला आहे. यासोबतच आवेश खान वेगवान यॉर्कर्सवर आणि ऑफ-स्टंपच्या बाहेर लोअर फुलटॉससह फलंदाजांना चकमा देण्यात यशस्वी झाला आहे.
लखनौचे गोलंदाज कोणत्याही धावसंख्येचा बचाव करण्यास सक्षम आहेत. मात्र, संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचे असेल तर आयुष बडोनीसारख्या युवा खेळाडूंना कामगिरीत सातत्य राखावे लागेल. केएल राहुलला पंजाबच्या संघाची रणनीती काय असेल, हे चांगल्याप्रकारे माहिती आहे, त्याचा फायदा लखनौला आजच्या सामन्यात मिळू शकतो.




