रायपूर : रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या अंतिम सामन्यात इंडिया लेजेंड्स ने श्रीलंका लेजेंड्सचा १४ धावांनी पराभव केला. सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचे विजेतेपद मिळवले. भारताने प्रथम फलंदाजी करत १८१ धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेला १६७ धावा करता आल्या.
अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या डावाची सुरूवात विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांनी केली. सेहवाग १० धावा करून बॅड झाला. त्यानंतर सनथ जयसूर्याने बद्रीनाथची विकेट घेत भारताला दुसरा धक्का दिला. भारताची २ बाद ३५ अशी अवस्था झाली. त्यानंतर सचिन ३० धावा करुन माघारी परतला. नंतर युसूफ पठाणने युवराज सिंगसह श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. युवराजने ३५ चेंडूत ३ षटकार आणि ४ चौकारांसह ५० धावा केल्या. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ९५ धावांची भागिदारी केली. त्यानंतर युवराज ६० धावांवर बाद झाला. युसूफ पठाणने ६२ धावा केल्या. तर इरफानने ३ चेंडूत ८ धावा केल्या.
विजयासाठी १८२ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेने चांगली सुरूवात केली. तिलकरत्ने आणि जयसूर्या यांनी पहिल्या विकेटसाठी ६२ धावांची भागिदारी केली. युसूफने तिलकरत्नेला २१ धावांवर बाद केले. त्यानंतर दिलशान 21 धावांवर बाद झाला आणि त्यानंतर चमारा सिल्वा अवघ्या दोन धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर इरफानने जयसूर्यला ४३ धावांवर बाद केले. उपुल थरंगाने संघासाठी 13 धावांचे योगदान दिले. जयसिंगाने 39 धावा केल्या तर नुवान कुलशेखरा एक धाव घेऊन नाबाद राहिला. भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत भारताला १४ धावांनी विजय मिळवून दिला. युसूफ पठाण आणि इरफान पठाण यांनी प्रत्येकी २ विकेट तर गोनी आणि पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.




