IND Vs AUS 2nd Test : कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मेलबर्न येथील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय संघाने धडाकेबाज कामगिरी करत विजय नोंदवला आहे. या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताला 70 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारतीय संघाने दोन विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.
ऑस्ट्रेलियन संघाने तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस ६ बाद १३३ पर्यंत मजल मारत दोन धावांची आघाडी मिळवली होती. सातव्या विकेटसाठी ग्रीन आणि कमिन्स यांच्यातील ५७ धावांच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. त्यांनतर कमिन्सला बाद करत बुमराहने भारताला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर काही वेळाने कॅमरुन ग्रीनही मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ४५ धावांची खेळी केली. यानंतर नॅथन लियॉनही सिराजच्या गोलंदाजीवर स्वस्तात माघारी परतला. जोश हेजलवूड आणि मिचेल स्टार्क जोडीने भारतीय गोलंदाजांना अखेरपर्यंत झुंजवत संघाला द्विशतकी टप्पा गाठून दिला. अखेरीस आश्विनने जोश हेजलवूडचा त्रिफळा उडवत कांगारुंचा दुसरा डाव २०० धावांवर संपवला. दुसऱ्या डावात भारताकडून मोहम्मद सिराजने ३, बुमराह-आश्विन आणि जडेजा यांनी प्रत्येकी २-२ तर उमेश यादवने १ बळी घेतला.
प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाची दुसऱ्या डावातही खराब सुरुवात झाली. सलामीवीर मयांक अग्रवाल दुसऱ्या डावातही अवघ्या ५ धावा काढून मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर मैदानावर आलेला चेतेश्वर पुजाराही ३ धावा काढून कमिन्सच्या गोलंदजीवर माघारी परतला. यानंतर आलेल्या अजिंक्य रहाणेने काही फटके लगावत भारतीय संघावरच दडपण कमी केलं. यानंतर शुबमन गिलनेही काही चांगली फटकेबाजी केली. शुभमन गिलने नाबाद 35 आणि अजिंक्य रहाणेने नाबाद 27 धावा केल्या. अॅडलेड कसोटीत दारुण पराभव झाल्याने टीम इंडियासाठी हा विजय अतिशय महत्त्वाचा ठरला.