अर्जेंटिनाचे माजी फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचं हृदयविकाराच्या झटक्यामुळे वयाच्या ६० व्या वर्षी निधन झालं आहे. काही दिवसांपूर्वीच एका अपघातामुळे मॅरेडोना यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया देखील झाली होती.
त्यानंतर मॅरेडोना यांना त्यांच्या मुलीच्या घरी हलवण्यात आलं होतं. ३० ऑक्टोबर रोजी मॅरेडोना यांनी आपला ६० वा वाढदिवस साजरा केला. १९८६ साली आपल्या दमदार खेळाने अर्जेंटिनाला विश्वचषकाचं विजेतेपद मिळवून दिल्यानंतर मॅरेडोना यांचं नाव फुटबॉलविश्वात प्रसिद्ध झालं होतं.
ड्रग्ज सेवन, दारु यामुळे मॅरेडोना काही काळ फुटबॉलपासून दूर होते. मात्र त्यांनी २००८ साली अर्जेंटिनाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून दमदार पुनरागमन केलं. मॅरेडोना यांनी अर्जेंटिनाच्या संघाला प्रशिक्षण देताना आपला ठसा उमटवला होता. अर्जेंटिनामध्ये मॅरेडोना यांची प्रचंड क्रेझ होती. १९८६ च्या विश्वचषक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडविरुद्ध सामन्यात झळकावलेल्या दोन गोलमुळे मॅरेडोना चर्चेत आले होते.